उस्मानाबाद - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे शुक्रवारी जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मात्र, या बैठकीत अधिकाऱ्यांच्या भानगडी लपवण्यासाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला असून पक्ष कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बैठकीत कुठलेही पदसिद्ध सदस्य नसताना देखील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. व त्यांच्या बैठकीची व्यवस्था जिल्हाधिकारी व पालकमंत्री अशा प्रथम वर्गातील अधिकाऱ्यांच्या पाठीमागे करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी होती. दरम्यान, पालकमंत्र्यांनी कामचुकार अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ असताना काही अधिकारी काम करत नाहीत. या कामचुकार अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी त्यांच्या कर्तव्याची कडक शब्दात जाणीव करून दिली.
जिल्ह्यात दुष्काळासोबतच चारा टंचाई, पाणीटंचाई असे असंख्य प्रश्न असताना काही अधिकारी कामचुकारपणा करतात. वारंवार आदेश देऊनही नागरिकांच्या अडचणी सोडवत नाहीत, अशा तक्रारी आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या अधिकार्यांना चांगलेच झापले, अशी माहिती आहे. या अधिकार्यांच्या भानगडी पत्रकारांच्या माध्यमातून इतर लोकांना माहित होऊ नये, यासाठी पत्रकारांना या बैठकीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी फैलावर घेतले होते. याचे वार्तांकन सर्वच माध्यमांनी केल्यामुळे या जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत अधिकार्यांची बदनामी नको म्हणून पत्रकारांना बैठकीत येण्यासाठी रोखण्यात आले, अशी चर्चा आहे.