उस्मानाबाद - प्रकाश आंबेडकर यांनी ओवैसींचा नाद सोडावा व आमच्या सोबत यावे आम्ही त्यांना सोबत घेण्यास तयार आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण रविवारी जिल्ह्यातील लोहारा येथील जनसंघर्ष सभेत बोलत होते.

काही महिन्यांपूर्वी तुळजापूर येथून जनसंघर्ष सभेला सुरवात झाली आहे. साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून ही जनसंघर्ष सभा आज लोहारा येथे पोहोचली आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबरोबरच त्यांनी ओवेसी यांच्यावर देखील टीका केली. त्यांच्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत आपण हरलो, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीचे खासदार झालेले आम्हाला आवडेल व आर.एस.एस.च्या बाबतीत त्यांच्या ज्या काही मागणी असतील त्याचा ड्रॅाफ्ट दयावा, आम्ही त्यामध्ये लक्ष घालू, असेही ते म्हणाले. त्याच बरोबर भाजप सरकारवरती टीका करत समान्य लोक सरकारकडे चारा आणि छावणी मागतात. मात्र, सरकार डान्सबार आणि लावणी देते, अशी टीका त्यांनी केली.
आंबेडकर यांच्या उत्तराची अपेक्षा असून आम्ही त्यांना ४ जागा दिल्या आहेत. ते मान्य करत त्यांनी महाआघाडी सोबत यावे ही आमची इच्छा असल्याचे सांगत राजू शेट्टींसोबत देखील चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानने जो हल्ला केला त्याचा प्रतिकार केला पाहिजे. आपले जवान मारले गेली आहेत. पाकिस्तानवरती कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. या सभेला आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांची उपस्थिती होती
