उस्मानाबाद - सध्या खरीप पेरणीचे दिवस आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या पावसात पेरणीस सुरूवात केली. मात्र, काही ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सोयाबीन न उगवण्यास कंपन्या जबाबदार असतील तर कारवाई करू, असे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले. सोयाबीनची पेरणी करूनही पीक उगवले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्या पुढे मांडली. याचीच दखल घेत दादा भुसे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेट देऊन शेतीची पाहणी केली.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते. सातत्याने पडणारा दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला होता. यातच कोरोनाने व आता हे बियाणे न उगवल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला होता. कृषीमंत्री दुबार पेरणीसाठी ठोस मदत जाहीर करतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ याचे संशोधन करीत असल्याचे त्यांनी सांगत वेळ मारून नेल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.