उस्मानाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसापूर्वी जिल्हा दौरा झाला. अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी मंगळूर येथील आदर्श सौदागर जाधव या चिमुकल्याने त्याची पिगीबँक मुख्यमंत्र्यांकडे जमा केली आहे. दौरा सपंवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तुळजापूर जिल्हा शासकीय विश्रामगृहाकडे आले होते. या दरम्यान आदर्शने जमा केलेल्या पैशांचा डब्बा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
साहेब, मी माझ्या खाऊचा एक-एक रुपया जमा केला आहे. मी हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत आहे, असे म्हणत आदर्शने पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदर्शचे कौतुक करत आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. या रक्कमेइतकी भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनी आदर्शच्या चेहऱ्यावर आनंद होता.