उस्मानाबाद- शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा झिशान सिध्दिकी 11 जुलै रोजी घरातून गायब झाला होता. भारत-पाकिस्तानच्या सीमेवरती कच्छ येथे भारतीय जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीमा सुरक्षा जवानांनी झिशानला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयच्या जामिनानंतर त्याला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उस्मानाबाद येथील झिशान सिध्दिकी हा 20 वर्षीय तरुण पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात पडला. दरम्यान, त्या मुलीचे इतर कोणाशी लग्न जमले. त्यामुळे प्रेयसीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानी सीमेवर गेला होता. पाकिस्तान सीमेत प्रवेश करण्यापूर्वीच सीमा सुरक्षा दलाने झिशानला ताब्यात घेतले होते.
उस्मानाबादमधील झिशान सिध्दिकी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुलीच्या संपर्कात आला. दोघेही प्रेमात पडले. प्रेयसीला भेटण्यासाठी तो गुगल नकाशाच्या आधारे कच्छ येथे दुचाकीवर पोहोचला. त्याठिकाणी त्याची दुचाकी वाळूत फसल्याने तो तेथून पायी चालत निघाला होता.
दरम्यान, 11 जुलै रोजीपासून झिशान सिध्दिकीचा तपास सुरू होता. तो कोणालाही न सांगता पाकिस्तानकडे निघाला होता. त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासणीत झिशान सिध्दिकी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलीवर प्रेम करत असल्याचे समोर आले. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी कच्छ पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, कच्छच्या वाळवंट भागात गस्त घालत असलेल्या बीएसएफच्या पथकाला एक दुचाकी अडकलेली आढळली आणि एका व्यक्तीची पावले पाकिस्तानकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे शोधमोहीम आखली असता पाकिस्तानी सीमेवर सीमा सुरक्षा दलाने झिशान सिध्दिकीला ताब्यात घेवून गुजरात पोलिसांच्या स्वाधिन केले.
झिशान सिध्दिकी वर कलम 1 आणि 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उस्मानाबाद पोलीस पथक झिशानला घेऊन येण्यासाठी कच्छ येथे पोहोचले होते. मात्र, उस्मानाबाद पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागले. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरच त्याला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.