उस्मानाबाद - भूम आणि परंडा पोलिसांच्या पथकाने मिळून एकत्र कारवाई करीत गांजाचे आंतरराज्य रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत 64.58 किलो गांजा जप्त करण्यात आला. तर पाच गांजा तस्करांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार?
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व प्रथम भुम तालुक्यातील चिंचोली फाटा येथे नाकाबंदीवेळी पोलिसांच्या पथकाने कारमधून (क्र. एम.एच.06 एबी 6457) चौघा व्यक्तींना 50.30 किलो गांजासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भूम ठाण्यात गुन्हा दाखल केले होते. यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि परंडा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यांचे संयुक्त पथक परंडा हद्दित या गुन्ह्यातील आरोपी सुभाष पवार याचा शोध घेत होते.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये 50 किलो गांजा जप्त; चौघे अटकेत
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अंतरगाव रस्त्यावरील सुभाष पवारच्या घरावर 12 नोव्हेंबरला छापा टाकला. यावेळी 22 कागदी पुड्यांमध्ये 48 किलो गांजा आढळून आला. तसेच दाराच्या समोरील उभा करण्यात आलेल्या एका कारमधून (क्र. एमएच. 25 के 1777) 10.8 किलो गांजा सापडला. हा सर्व गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका पीकअपमधून 6 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी सुभाष पवार, रामदास पवार, अमोल पवार, आण्णा पवार तसेच विशाखापट्टनम येथील नागेंद्रबाबु सालु जेमेल्ली यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन दिवसांपर्वी आढळला होता गांजा -
नाकाबंदी करते वेळी पोलिसांना जवळपास 50 किलो गांजा आढळला होता. त्यावेळी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील दोघांना आणि भूम तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली होती. गाडीच्या डिग्रीमध्ये पशुखाद्याचे पॉलिथिन पोत्यामध्ये हा गांजा ठेवण्यात आला होता. त्यानंतरच चौकशी केल्यानंतर आता आंतरराज्य गांजा तस्करांचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.