उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही या विवंचेनेत सापडलेले नांदेड जिल्ह्यातील शेतमजूर बार्शीहून पायी आपापल्या गावी निघाले होते. या ३२ शेतमजुरींना त्यांच्या कुटुंब कबिल्यासह कळंब पोलिसांनी पकडले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पायी प्रवास करून आज (शुक्रवारी) ते सर्व कळंब येथे पोहचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गेल्या तीन दिवसांपासून ते शक्यतो रात्रीचा प्रवास करत होते आणि मुक्कामासाठी गावाच्या बाहेरच शेतमाळावर आश्रय घेत होते. अशा अंधारात प्रवास करून त्यांना नांदेड येथे पोहचायचे होते. मात्र, आज कळंब येथे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन शहरातील कन्या शाळेत ठेवले आहे. या शेतमजुरांसोबत त्यांची बायका-मुलं आणि कपड्यालत्त्याची गाठोडी आहेत. या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर येणार आहेत.