मनमाड (नाशिक) - ट्रक खाली चिरडून एका तरुण कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मनमाड जवळील इंडियन ऑईल कंपनीच्या गॅस प्रकल्पात घडली. बाटनू पाला (वय ३४, रा. कमलापूर, आसाम) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रकल्पात ट्रकमध्ये सिलिंडर लोड करण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनमाड शहरापासून सुमारे ७ किमी अंतरावर इंडियन ऑयल कंपनीचा गॅस प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दररोज शेकडो ट्रकच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागात गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. आज सकाळी ट्रकमध्ये सिलिंडर भरण्याचे काम सुरू असताना अचानक एका ट्रक खाली सापडून बाटनू पाला या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पाला हा मुळचा आसामचा रहिवासी असून तो जिल्ह्यातील आर. के. ट्रेडर्स यांच्याकडे काम करत होता.
नियमानुसार कंपनीत काम करणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कंपनी आणि ठेकेदाराची असते. मात्र, मृत तरुण पर राज्यातील असल्याने हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकार कंपनीच्या आत घडल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.