नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील काही युवकांनी सामाजिक जनजागृती करण्यासाठी कुठल्याही मानधनाची अपेक्षा न बाळगता एक छोटासा लघुपट तयार करून, समाजहिताची जबाबदारी जोपसली असून, सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्दात हेतूने, दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथे 'वास्तव'ह्या लघुपटाची निर्मिती दिलिप गांगोडे यांनी केली आहे. 12 मिनिटांच्या या लघुपटाद्वारे 'आज तुम्हीच तुमचे रक्षक आहात' हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपली एक लहानातली लहान चुक कसं आपल हसतंखेळतं कुटुंब उध्वस्त करते, याचे भयानक वास्तव या कथेतून मांडण्यात आले आहे. या छोट्याशा कथेत खूप सारे संदेश देण्याचा प्रयत्न टीमने केला आहे, यातील एक प्रसंग तर अक्षरश: मन हेलावून टाकत घाव करून चटका देऊन जातो.
या कोरोना वास्तव लघुपटात विशाल राऊत, ॠतूजा पाटील, स्वरा, कृष्णा यांनी प्रमुख भुमिका केली आहे. पंकज अस्वले, निलेश क्षीरसागर, सुर्रकने शिरसाट, शरद जोपळे या टीमने, केवळ सामाजिक जनजागृती व्हावी या निव्वळ हेतूने लघुपटाची निर्मिती केली असल्याचे, कलाकार विशाल राऊत, ऋतुजा पाटील, यांनी सांगितले.