नाशिक - लग्नाच्या दोन दिवस आधीच नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात घडली आहे. निखील देशमुख असे त्या नवरदेवाचे नाव आहे. या घटनेबाबत आकस्मित मृत्यूची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने देशमुख कुटुंब आनंदात होते. मात्र, व्यावसायिक असलेल्या निखीलने हळदीच्या आधल्या रात्रीच सातपूर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्यांचा निखील हा एकुलता एक मुलगा होता. निखील हा गुरुवारी रात्री सात वाजता घराबाहेर पडला त्यानंतर त्याचा फोन बंद आला त्यानंतर त्याचा शोध घेतला असता, सातपूर येथील त्यांच्या दुसऱ्या घरात निखीलने आत्महत्या केल्याचे समोर आले.
त्याचा विवाह शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीशी होणार होता. शुक्रवारी हळद आटपून शनिवारी मंगलाष्टके होणार होते. कुटुंबांनीदेखील लग्नाची जय्यत तयारी केली होती. मात्र अक्षदा पडण्याअगोदरच निखीलने आपले आयुष्य संपवल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
पोलिसांना मिळाली सुसाईड नोट -
'मी आयुष्यात काहीच करु शकलो नाही. म्हणून मी जीवन संपवत आहे', असा मजकूर या नोटमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.