नाशिक - दारू पिऊन घरात सतत त्रास देणाऱ्या भावाची लहान भावाने दगडाने ठेचून हत्या केली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास आरटीओ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. संतोष सखाराम थोरे, असे मृत भावाचे नाव आहे.
पूजा विहार रो हाऊसेस, मखमालाबाद याठिकाणी राहणाऱ्या संतोष थोरे याला दारूचे व्यसन होते. संतोष रोज दारू पिऊन कुटुंबीयांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून संतोषची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती. मात्र, यानंतरही संतोषने कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळलेल्या लहान भावाने रागाच्या भरात संतोषची दगडाने ठेचून हत्या केली. संतोषचा मृतदेह पेठ रोड भागात असलेल्या नामको हॉस्पिटलच्या समोरील मोकळ्या आवारात फेकून दिला.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.