औरंगाबाद - वाळूज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे गुप्तांग कापून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. सुधाकर वारागंणे (वय ३०, रा. मौलखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाळूज ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची हत्या त्याच्याच सोबत राहणाऱ्या एका सहकाऱ्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयित आरोपी पंरप्रांतिय असून तो सध्या फरार आहे. संशयित आरोपी हा या ठिकाणी बनावट नावाने वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे..
अशी पटली होती मृतदेहाची ओळख -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घनटेत ३ जुलैला वाळूज परिसरातील पडक्या विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. वाळूज पोलिसांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर या घटनेतील मृतदेहाचे फोटो व्हायरल केला होते. मौलखेडा (ता. सोयगाव) येथील एका शिक्षकाकडे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी हा सुधाकर वारागंणे असल्याचा संशय व्यक्त केला व त्याच्या भाऊ किशोर आनंदा वारागंणे याला माहिती दिली होती. त्यांने पोलिसांशी संपर्क साधला. सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविला. तेव्हा तो मृतदेह सुधाकर वारागंणे याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
सर्व जण एकाच कंपनीत होते कामाला -
मृत सुधाकर हा दिनेश मुन्नालाल बंसकार (रा. सोहगपूर, जि. होशंगाबाद), विनीत गणेश बसौत (रा. रायपूर, जि. नरसिंगपूर) आणि बन्सीलाल ऊर्फ बंटी लाल चामार (रा. रायपूर, जि. नरसिंगपूर, मध्य प्रदेश) आणि आरोपी मोहंमद जुबेर जाकेर हुसेन या चौघांसोबत लिंबेजळगाव येथे खोली करून राहात होता. ते सर्वजण लिंबेजळगाव भागातील एका कंपनीत कामाला होते.
बेपत्ता असलेल्या जुबेरवर आला संशय -
सुधाकरच्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटल्यानंतर त्याच्या रूम पार्टनरला बोलावून त्यांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलैला दिनेश, विनीत, बंटी आणि सुधाकर हे रिक्षाने कंपनीत निघाले होते. काही अंतरावर गेल्यानंतर सुधाकरने रिक्षा थांबवून पायाला दुखापत असल्याने मी कामावर येत नाही. खोलीवरच थांबतो, असे सांगून तो खोलीवर परतला होता. तेव्हा चौथा पार्टनर जुबेर हा खोलीतच होता. रात्री ८ वाजता कंपनीतील तिघे खोलीवर आले. तेव्हा सुधाकर आणि जुबेर हे दोघेही खोलीत नसल्याची माहिती त्यांनी त्यांच्या घरच्यांना दिली होती. दरम्यान, त्याच्या भावाने सुधाकर हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. जुबेर हा अद्याप फरार असून त्यांनेच हा खून केला असावा, असा संशय त्या तिघांनीही पोलिसांजवळ व्यक्त केला होता.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल -
याप्रकरणी मृत सुधाकरचा भावाने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहेत.
हेही वाचा -दारुसाठी आईचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन काढले काळीज, नराधम मुलाला फाशीची शिक्षा