नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सातपूरला एका कामगाराचा खड्ड्याने बळी घेतला आहे. अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर जवळ ही घटना घडली आहे. दुचाकी घेऊन कामावर जाताना, खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात तोल गेला व आयशर गाडीखाली सापडून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मोठ्या रस्त्यांची दुरवस्था : सातपूरच्या श्रमिक नगर भागात राहणारे 41 वर्षीय राजकुमार सिंह हे कामावर जाण्यासाठी निघाले होते. खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी घसरली. त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशरखाली ते सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार समोर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहरात पाऊस कमी असला तरी, जो काही पाऊस झाला त्यामुळे अनेक मोठ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
खड्ड्यांमधून वाहन चालकांची कसरत : गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे वारंवार बुजवल्याने त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे होऊ लागले आहेत. यामुळे खड्ड्यात दुचाकी आदळून पडणे, दोन वाहनांमध्ये अपघात होणे अशा घटना घडत आहेत. तर खड्ड्यांमधून वाहन चालकांना कसरत करत वाट काढावी लागते. तर महानगरपालिका पावसाळा संपण्याची वाट बघत आहे.
महानगरपालिकेला जाग येईल का : सातपूर-अंबड लिंक रोडसह त्र्यंबकेश्वर रोड जवळील जाधव संकुल सिग्नल येथे खड्डे पडले आहेत. पालिकेने वारंवार खडी, माती टाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खड्डे बुजवल्यानंतर लगेच त्यातील खडी, माती रस्त्यावर आल्याने, वाहने घसरण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता या खड्ड्यांनी एक बळी घेतल्यानंतर तरी महानगरपालिका अधिकाऱ्यांना जाग येईल का? अशी विचारणा नागरिक करत आहेत.
उच्च न्यायालयात जाणार : तीन आणि पाच वर्षाच्या मुदतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदारांवर बांधकाम विभागाने कारवाई केली नाही. जनतेच्या करातून सुमारे 700 कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाला. दर्जेदार रस्ते करून न घेणे आणि खराब झाल्यानंतर दुरुस्ती करुन घेतली जात नसल्यानं, मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसात तीन ते पाच वर्ष मुदतीतील रस्त्यांची दुरुस्ती करून दिली जाणार आहे की नाही, हे बांधकाम विभागानं लेखी स्पष्ट करावं. नवीन रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष ही स्थिती पुढील सुनावणीत उच्च न्यायालयासमोर मांडली जाईल असं, माजी महापौर दशरथ पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -