नाशिक - वाहन चालवण्यात पुरुषांची मक्तेदारी पहायला मिळते. मात्र, याला छेद देत नाशिकमध्ये पुरुष नाही, तर चक्क महिला स्कूल बस चालवताना दिसत आहे. गुंजन पुरोहित, असे या महिला स्कूल बस चालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांनी विविध प्रकारच्या सौंदर्य स्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
गुंजन यांनी एम. एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी नोकरी केली. पण ही नोकरी करत असताना त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नव्हता. यामुळे त्यांनी नोकरी सोडून स्कूल बस ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला. सीएची प्रॅक्टिस करणाऱ्या पतीनेसुद्धा त्यांना योग्य साथ देत स्कूल बस चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले. दोन मुलांपासून सुरुवात केलेल्या गुंजन या आज ५० मुलांची स्कूल व्हॅनने ने-आन करत आहेत. गेल्या ७ वर्षांपासून त्या शाळेतील मुलांना स्कूल बसची सेवा देत आहेत.
सुरुवातीला महिला स्कूल व्हॅन चालवते म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. स्कुल व्हॅन चालवणे हे महिलांचे काम नाही म्हणून अनेकांनी मला सल्ले दिले. मात्र, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्या या व्यवसायात टिकल्या, असे गुंजन सांगतात. तसेच एक महिला आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकते आणि आपली मुलं सुरक्षित प्रवास करू शकतात, या एका उद्देशाने पालकांनीदेखील गुंजन यांच्यावर विश्वास दाखवला. आज त्यांच्या स्कूल बसमधून नर्सरीपासून ते १० वीपर्यंतचे विद्यार्थी प्रवास करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे.
स्कूल व्हॅनच्या व्यवसायासोबतच गुंजन यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेत आपला ठसा उमटवत आहेत. मित भाषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंजन यांच्याकडे आज प्रत्येक व्यक्ती आदराने बघत आहे. गुंजन यांच्या नणंद भाग्यश्री शिवडेकर यासुद्धा गेल्या १५ वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पासूनच मला स्कूल बस चालवण्याची प्रेरणा मिळाल्याचे गुंजन सांगतात.