नाशिक - शहरात वयोवृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी भररस्तात सात तोळ्याच्या बांगड्या लुटल्याची घटना मंगळवारी घडली. हा सर्व प्रकार या परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस असल्याचे सांगत घेतले अंगावरचे दागिने -
पंचवटीतील ओम नगर परिसरात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हिरावाडी येथील सुशीला सुरेश गुजराती या घरगुती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी एकाने आपण पोलीस असून पुढे एक मोठी दुर्घटना घडली आहे, असे सांगून तुम्ही इतके महागडे दागिने घालून पुढे जाऊ नका असे बजावले. तुमच्या जवळील सोने माझ्याकडे द्या म्हणत, त्यांच्या जवळील बांगड्या घेतल्या, असे सुशीला गुजराती यांनी सांगितले.
पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल -
ते दोन व्यक्ती होते एक व्यक्ती पाळत ठेवत होता तर दुसरा व्यक्ती महिलेला बोलण्यात अडकवत होता. प्रथम महिलेकडे त्यांनी बांगड्या मागितल्या नंतर गळ्यातील मंगळसूत्र मागितले. परंतु, महिलेने बांगड्या दिल्यानंतर मंगळसूत्रही दिले आणि त्यांना फसवणूकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडून मंगळसूत्र घेतले. परंतु, या भामट्यांना चाहूल लागताच त्यांनी बागड्या घेऊन तिथून पळ काढला, असे सुशिला यांनी सांगितले. याप्रकरणी गुजराती यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - जय मोदी बाबा! वाढत्या महागाईच्या विरोधात 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी केली पंतप्रधानांची उपरोधिक आरती