नाशिक - मनमाडच्या चारही बाजूला कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे, तर दररोज भरणारा बाजार एक दिवसाआड सकाळी ८ ते ४ वाजता भरवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तू घेणाऱ्यांची गर्दी होत आहे. त्यासाठी पालिकेच्यावतीने सर्वांना रांगेत उभे करून एक-एक बाजारात सोडले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १३० पोहोचला आहे. मनमाडला लागून असलेल्या मालेगावमध्ये ११५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तसेच चांदवड, लासलगाव याठिकाणी देखील कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मनमाड नगरपालिकेने आठवडी बाजार रद्द केला आहे. तसेच एक दिवसाआड भरणाऱ्या बाजारात देखील सोशल डिस्टन्सिंगला तडा जावू नये म्हणून नागरिकांच्या रांगा लावल्या जात आहेत. त्यामुळे बाजारात गर्दी कमी झाली असून नागरिक आणि दुकानदार यांना देखील सोयीचे झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर हे विविध उपाययोजना करत आहेत. तसेच पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेत असून नागरिकांनी आपआपली जबाबदारी ओळखून घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.