नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४ पैकी १६ धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर इतर धरणांमध्ये फक्त ५ टक्के पाणीसाठा उरला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या २ दिवसांपासून नाशकात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिकसह इगतपुरी, पेठ, त्रंबकेश्वर, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, बागलाण, देवळा, निफाड आणि येवला या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. येवला तालुक्यात सर्वाधिक ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर सुरगाणा येथे १७.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ भागातही चांगला पाऊस झाला आहे. मात्र, जून महिना संपत आला आहे. तरी पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांपैकी १६ धरणात शून्य टक्के पाणीसाठा उरलेला आहे, तर इतर धरणांमध्ये फक्त ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
शून्य टक्के पाणीसाठा असलेले धरण -
आळंदी धरण, करंजवन धरण, पुणेगाव धरण, तिसगाव धरण, भावली धरण, वालदेवी धरण, कडवा धरण, नांदूर मध्यमेशवर, चनकापूर धरण, मुकणे धरण, भोजापूर धरण, हरणबारी धरण, केळझर धरण, नागासक्या धरण, माणिकपुंज धरण, वाघाड धरण आदी धरणामध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.