नाशिक - शहरात रविवार पासून पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसे आदेश महापौर रंजना भानसी यांनी पाणीपुरवठा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात आता दोन वेळेऐवजी आता दिवसातून एकच वेळा पाणीपुरवठा होणार आहे. आणि पुढील आठवड्यापासून गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत रविवार पासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मनपा आयुक्त, महापौर उपमहापौर, विरोधी पक्षनेते यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. यापुढे फक्त एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे. यावर्षी पाऊस लांबला आहे. आणि गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीकपात लागू केली आहे.
यंदा पाऊस लांबल्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणी कपात करावी लागली आहे. दारणा धरणातून पाणी उचल बंद झाली असून गंगापूर आणि मुकणे धरणावर नाशिककरांची तहान भागत आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता मनपा प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.