नाशिक - उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी तीव्र पाणी टंचाई भासत असते. नाशिक जिल्ह्यातील रोहिले गावातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त झाले आहे. विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले गावातील पाणीटंचाईची भयावह परिस्थिती समोर आली आहे. पाण्यासाठी काही महिला दोन किलोमीटरचे अंतर कापून चक्क विहिरीत उतरत आहे आणि पाणी भरत आहे. यामध्ये दुर्घटना होऊन काही महिला विहिरीत पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.
यंदा पाण्याची स्थिती चांगली - जिल्ह्यातील या परिसरात दरवर्षी पाण्याची टंचाई असते. त्यामुळे प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था केली जाते. तसेच पाण्याचे प्रमाणही ठरवून दिल्या जाते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अलका अहिरराव यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी येते आणि पिण्याच्या हेतूने आणि इतर कामांसाठी वितरणासाठी पाण्याचे प्रमाण ठरवले जाते. शिवाय येत्या जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुली लातात जीवाची बाजी - आम्हाला रोज पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन भर उन्हात दोन किलोमीटर चालवे लागतात. एवढेच नाही तर तर जीवाची बाजी लावून विहित उतरावे लागते. माझी 10 वीची परीक्षा आहे. मात्र पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागते. मग अभ्यास कधी करणार, पाण्याची समस्या असल्याने आमच्या गावातील मुलांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही. पाण्याचा टँकर पण येत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला हा संघर्ष करावा लागतो, असे एक मुलीने सांगितले आहे.