नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहे. मात्र अल्पशा काळात मतदारांपर्यंत आपली निशाणी पोहचावी यासाठी सर्वच उमेदवार वेगवेगळे फंडे वापरतात. मात्र, नांदगाव मतदारसंघातील उमेदवारांनी जादूगरांचा फंडा अवलंबविला आहे. हे जादूगर थेट गल्ली-बोळात जाऊन आपल्या जादूईकलेच्या माध्यमातून उमेदवारांचा अनोख्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
नांदगाव तालुक्यात यंदा शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र पगारे यांनी आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी जादूगारांना आमंत्रित केले आहे. हे जादूगर शहरातील गल्ली बोळात, मुख्य चौकात आपल्या जादूच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवाराचा फोटो काढून दाखवत आहे.
कानातून पाणी काढणे, जादूई पोतडे रिकामे दाखवून त्यातून पक्षाची निशाणी असलेला झेंडा काढणे. त्यातून जनतेला याच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन हे जादूगर करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जादूचे प्रयोग पाहण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी होत आहे. जादूच्या या प्रयोगांमुळे उमेदवारांची निशाणी आपोआप मतदारांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे उमेदवारांचा जादूचा फंडा सध्या चर्चेत आला आहे. वंचितकडून काहीतरी वेगळे करून प्रचार करण्याचा मोठा फंडा वापरला जात आहे. मात्र जादुगिरीच्या फंड्याचा वंचित बहुजन आघाडीला किती फायदा होते, हे निकालाच्या दिवशीच कळेल.