नाशिक - दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात 69.68 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात चुरस दिसून आली असून पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आकडेमोड करत आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करत आहे.
दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली 322 मतदान केंद्रावर सकाळी सात पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने उसंत दिल्याने सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. तळेगाव दिंडोरी, वनारवाडी जोपुळ आदी ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला यानंतर काही काळानंतर मतदान यंत्र दुरुस्ती होत मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
हेही वाचा - 1960 ते 2019 नॉनस्टॉप मतदान; सखुबाई नामदेव चुंभळे यांचा अनोखा विक्रम
सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. शिवसेना भाजप युती, काँग्रेस राष्ट्रवादी महा आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मतदारांची ने आण करत आपल्याच उमेदवारास मतदान करण्यासाठी साद घालत होते. दुपारी काही वेळ मतदानाचा वेग मंदावला मात्र तीन नंतर मतदानास वेग आला. पेठ व दिंडोरीच्या पश्चिम भागातील रोजगारासाठी बाहेर गेलेले मतदार मतदानासाठी आले होते. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे आयडियल तर दिंडोरी येथील व्हिएन नाईक विद्यालयात सखी केंद्र आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले येथील सेल्फी पॉइंटवर मतदारांनी मतदान झाल्यावर सेल्फी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचा - नाशिकमध्ये सखी मतदान केंद्र सजले गुलाबी रंगात, महिलांमध्ये मतदानाचा उत्साह
राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांनी वनारे येथे तर शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांनी राजबारी येथे व वंचित आघाडीचे अरुण गायकवाड यांनी दिंडोरीत मतदान केले. तिन्ही उमेदवारांनी मतदार आपल्यालाच निवडून देतील असा, विश्वास व्यक्त केला. दिंडोरी, वणी व पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.