नाशिक - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि रस्त्यावरील खड्यांमुळे नाशिकमधील वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहनधारकांना रस्त्यातील खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने महानगरपालिकेने आपले सर्व लक्ष आरोग्य विभागाकडे केंद्रित केले आहे. दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे अपघाताच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. नाशिक गंगापूर, पंचवटी, द्वाराका, सिडको, सातपूर नाशिकरोड आदी भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. त्यात अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने वाहनधारकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हेही वाचा - भारतीय लिपींद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना
नाशिक महानगरपालिका शहरातील रस्ते बनवण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी दरवर्षी कोटी रुपये खर्च करत असते. मात्र, अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे नाशिक शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात येत आहे.