मनमाड - शहरात डी.सी.एच.सी. सेंटर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी मनमाड नगरपरिषदच्या गेटवर वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मनमाड हे नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून कामगारवस्तीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मनमाडची लोकसंख्या जवळपास सव्वा लाखाच्यावर आहे. तरीही महाराष्ट्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. मनमाड शहरात जवळपास 18 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, अजून किती बळी गेल्यावर सरकार आमची दखल घेईल, असा प्रश्न उपस्थित करत आज वंचित बहुजन आघाडीने राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. कोविड सेंटरला जागा उपलब्ध होत नसल्याचे सांगत आरोग्य विभाग मनमाडच्या जनतेच्या जीवाशी खेळत असून कोविड सेंटर होईल तेव्हा होईल, सध्या आम्हाला रेल्वेचे आयसोलेशन कोच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वंचितचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी केली आहे. येत्या 5 दिवसात जर कोच उपलब्ध झाले नाही, तर आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी पगारे यांनी सांगितले.