मनमाड - 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे काल(१ मे)पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, लसच उपलब्ध नसल्याने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात सर्वच लसीकरण बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने घोषणा करण्याआधी लस उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्यभरात लसीकरण सुरू झाले आहे. मनमाडमध्ये लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याचे उपजिल्हा रुग्णलायचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरवणे यांनी सांगितले. 45वर्षांवरील नागरिकांसाठी देखील लस उपलब्ध नसल्याने संपूर्ण लसीकरण प्रक्रियाच बंद आहे. 18 वर्षांवरील नागरिकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा लसीकरण पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही नरवणे म्हणाले.
शहरात केवळ 4 हजार 200 जणांचे लसीकरण -
मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून शहराची लोकसंख्या सव्वा ते दीड लाख आहे. मात्र, या ठिकाणी फक्त 4 हजार 200 नागरिकांनीच लस मिळाली आहे. लोकसंख्या बघता हा आकडा खूपच कमी असल्याने सरकारी यंत्रणेने लसीकरण करण्यासाठी जनजागृती करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
४५ दिवसात २०२ जणांचा मृत्यू
मार्च आणि एप्रिल महिना मिळून मनमाड शहरातील कोरोनाबधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या ४५ दिवसात तब्बल २०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा मोठा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र, तरीही नागरिक हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र दिसत आहे.