नाशिक - कोरोनाशी लढा देताना कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू नये. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी १४ वा वित्त आयोग आणि पेसा(अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी उपयोजना निधी उपलब्ध करुन देण्याची योजना) निधीचा काही भाग खर्च करण्या संदर्भात नियोजन करण्यात यावे, असे मत विधानसभा उपाध्यक्ष नरही झिरवाळ यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात इगतपुरी आणि त्र्यबंकेश्वर या दोन्ही तालुक्यातील महसूल, आरोग्य, पंचायत समिती व नगरपरिषदेने केलेले कामाकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, डॉ. मंदाकिनी बर्वे उपस्थित होते.
कोरोना उपाययोजनांना देण्यासाठी आपल्याकडील शक्य तितका निधी उपलब्ध करून घ्यावा. त्यातून इगतपुरी आणि त्र्यबंकेश्वर तालुक्याला आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यात यावीत. तसेच या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावाला दोन थर्मल गन आणि एक पल्स ऑक्सीमिटर खरेदी करावे, जेणेकरुन कोरोनाचे निदान करण्यासाठी गावपातळीवर मदत होईल. या उपकरणांच्या मागणीची माहिती ग्रामसेवकांकडून घेण्यात यावी, असेही झिरवाळ यांनी सांगितले.
धान्य वितरणात गैर व्यवहार रोखण्यासाठी दक्षता घेण्यात यावी. धान्य वितरण करताना प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळावे यासाठी पुरवठा विभागाने धान्य वितरण व्यवस्था तत्काळ अद्ययावत करावी. ग्राहकांना धान्याचे भाव स्पष्ट दिसावेत यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारांना जाहिरात फलक ठळक अक्षरात लावण्याची सूचना झिरवाळ यांनी केली. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या धान्य वितरणाचा आढावाही त्यांनी घेतला.
मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करा -
कोरोनामुळे शहरातील बरेच लोक आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे गाव पातळीवर रोजगार हमी योजनेतंर्गत कामांची मागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देण्याबाबत दोन्ही तालुक्यांनी प्रयत्न करावेत, असे झिरवाळ यांनी सांगितले.
१४ वित्त आयोग व पेसातील निधीतून आरोग्य विभागाला -
कोरानासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा १४ वित्त आयोग व पेसातील निधीमधून खरेदी करण्यात याव्यात. तसेच त्र्यंबकेश्वरला आवश्यक असणाऱ्या व्हेंटीलेटर, पीपीई किट, लिक्वीड सोप सोल्यूशन, डिजीटल बीपी मशीन, ट्रीपल फेस मास्क आदीची आवश्यक मागणी शासनाला कळवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन क्वारंटाईन केंद्र असून, त्यात ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन कोरोना केअर सेंटर कार्यरत असून त्यात १८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रस्तावित सेंटर मध्ये ४४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५० बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.