नाशिक - जिल्ह्यातील येवला येथे जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी काही प्रमाणात अडचणीत आला आहे. गहू आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेला गहू व कांदा भिजल्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
येवल्यात रात्री 3च्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला असून परत एकदा पावसामुळे शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुलडाणा, अकोला, हिंगोली नाशिकसह अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने फळबागांसह गहू आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.