नाशिक - आज(बुधवारी) पहाटे मनमाड शहरात अज्ञातांनी आययुडीपी भागात योगेश शर्मा यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या 2 मोटरसायकली जाळल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे, नाशिक या मेट्रोसिटी पाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील दुचाकी जाळण्याचे लोण पसरत आहे. मनमाड येथील आयुडीपी या भागातील योगेश शर्मा यांच्या घरासमोर उभे असलेल्या 2 दुचाकी अज्ञात व्यक्तीने पहाटे चारच्या सुमारास जाळल्या. तसेच त्यांच्याच मालकीच्या मालवाहतूक गाडीचे चारही टायर फोडण्यात आले आहेत.

पहाटे चार वाजेच्या सुमारास शेजारच्यांनी गाडीला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर शर्मा आणि परिसरातील नागरिकांनी आग विझविली. याबाबत मनमाड शहर पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या भागातील सीसीटीव्ही फूटेज मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. संबंधित घटना समोर येताच तपासाची चक्रे गतीने फिरवत काही संशयितांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तविली आहे.