नाशिक : समृद्धी महामार्ग आणि अपघात यांची मालिका संपतच नाही आहे. आपण अनेकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याच्या बातम्या ऐकत आहोत. आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. काम सुरू असतांनाच समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यान हा पुल कोसळला आहे. पुलाचे काम सुरू असताना अचानक हा पूल मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या कोसळला. इगतपुरी तालुक्यातील गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह : एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रवासांसाठी खुला झाला आहे. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत आहे. समृद्धी महामार्गावर अपघातात आत्तापर्यंत 29 जणांचा बळी गेला आहे. असे असतानाच आता समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. काम पूर्ण होण्याच्या आधीच समृद्धी महामार्गावरील कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघात : 11 डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाची लांबी 701 किमी आहे. या महामार्गावर सहा लेन आहेत. हा महामार्ग 390 खेड्यांमधून जातो. महाराष्ट्रातील दहा जिल्हे या मार्गात येतात. समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र, या मार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे. यातील काही अपघात रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना येऊन गाडी धडकल्याने झाले आहेत. रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम अथवा पेंट असलेले रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे ग्रामीण आरटीओ ने केलेल्या कारवाईत आढळून आले आहे.