नाशिक - गोदावरीत नदीपात्रात अघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे रविवारी सायंकाळी घडली. शामराव बाळु सुरवाडे आणि हर्षद निलेश गुंजाळ असे त्या बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान यातील हर्षदचा मृतदेह आज सकाळी गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. तर शामरावचा शोध सुरू आहे.
शामराव बाळु सुरवाडे (वय 23) हा आपल्या बहिणीच्या विवाहासाठी आलेल्या मामेभाऊ हर्षद निलेश गुंजाळ ( वय 18 ) याच्यासोबत रविवारी दुपारी पिंपळस गावाजवळील गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. यावेळी दोघेही गोदावरी नदीपात्रात आंघोळ करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
सायंकाळी उशीरा मुले घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी नदीकिनारी दुचाकी व कपडे आढळून आले. याबाबत तत्काळ निफाड पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशीरा चांदोरी येथील युवकांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. घटना घडून तब्बल बावीसतास उलटले, तरी प्रशासनाकडून बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हर्षदचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह निफाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. गोदावरी नदीकाठावर अद्यापही शामराव बाळु सुरवाडे याचा शोध सुरु आहे.