नाशिक - शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. पंचवटी परिसरात अवघ्या दोन तासातच दोन वाहनांतून लाखोंच्या रकमेसह लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यातील गस्त फक्त नावालाच उरली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मखमलाबाद नाक्यावरील ललवाणी ट्रेडींग या दुकानाबाहेर साहेबराव दळवी यांच्या इंडिका गाडीतून चोरट्यांनी गाडीच्या पुढील सीटवर ठेवलेली बॅग लंपास केली आहे. या बॅगमध्ये जवळपास एक लाख ९१ हजार रुपये असल्याची माहिती पोलीससुत्रांनी दिली आहे. या घटनेचा पंचनामा करून फिर्यादी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला येतो न येतो तोच रामकुंडावरील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून (क्र. एम एच ०६ बी ई ८५६५) मागील दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप लंपास केला आहे. हे कुटुंब दिल्लीहून देव दर्शनासाठी आले होते.
हेमंत कृष्णकुमार ठाकुर (रा. गुरुग्राम हरियाणा) हे नाशकात देव दर्शनासाठी आले असता, रामकुंडावरील साईबाबा मंदिरामागे असलेल्या पालिकेच्या पार्किंगमध्ये त्यांची चारचाकी लावून देवदर्शनाला गेले होते. यावेळी चोरट्याने वाहनाची मागील काच फोडून लॅपटॉप लंपास केला. याबाबात ठाकुर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक कैलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनोज शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस सीसीटीव्हीचा आधारे चोरांचा तपास करत आहेत.