नाशिक - जिल्ह्यात वेळेवर ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणून दोन कोरोनाबाधित रुग्णांनी हॉस्पिटलच्या दारात दम तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची समस्या समोर आली असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता
नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. रोज तीन ते चार हजार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. शहरातील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना बेडसाठी शहरभर फिरावे लागत आहे. यातूनच दोन कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या दारातच दम सोडल्याची घटना घडली आहे.
ऑक्सिजन बेडशिवाय दोघांचा मृत्यू
नाशिक रोड येथील कोविड सेंटर बाहेर ऑक्सिजन बेड मिळवा यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते. मात्र, त्यानंतरही बेड मिळत नाही. वेळेवर ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला काही तास उलट नाही तोच नाशिक जिल्हा रुग्णालयातच्या दारावर तीन तास बेड मिळण्यासाठी धडपड करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. एकूणच नाशिकमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याचे चित्र समोर आले आहे.
आईला तीन तास घेऊन फिरलो पण काही उपयोग झाला नाही.
माझ्या आईवर घरी उपचार सुरू असताना अचानक ऑक्सिजन संपले. मग आमची सिलेंडर आणि रुग्णवाहिका मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली. आम्ही आईला अखेर रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, येथेही बेड उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी आम्हला सांगितले. मी त्यांना एकदा आईला बघा तरी अशी हात जोडून विनंती केली मात्र, मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर माझ्या आईचा रिक्षातचं तडफडून मृत्यू झाला, असे मृत महिलेच्या मुलाने सांगितले.
बेड कन्फर्म असल्या शिवाय रुग्णांना आणू नये.
जिल्हा रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना बेड मिळत नाही. बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येऊ नये. सध्या अत्यंत अवघड परिस्थिती आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना विनंती आहे, की बेड कन्फर्म झाल्याशिवाय रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह करू नये, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल सौंदाणे यांनी केले आहे.