नाशिक - जिल्हयात मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येवल्यात आज आणखी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27 वर पोहोचली आहे.
मंगळवारी एकाच दिवशी 17 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यात ग्रामीण रुग्णालयातील 10 जणांचा समावेश आहे. येवल्यातील आरोग्य विभागातही कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येवला शहरानंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील पाटोदा, गवंडगाव अशा गावांमध्ये प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केल्याने जनतेची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारांटाईन करण्यात आले आहे. शहरातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येवल्यातील नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान, आणखी 27 जणांचे अहवाल येणे बाकी आहे .