नाशिक - दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे पिकअपच्या धडकेत दोन पादचारी ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात ही घटना घडली आहे. अपघातामधील मृत आणि जखमी पादचारी हे शिर्डीला पायी यात्रा करत निघाले होते. मनीष धर्मेश हडपती( वय -15) व अश्विन ईश्वर पटेल (वय - 35) (रा. दमण गुजरात) अशी मृतांची नावे आहेत. तर हरीश भाई बाबुभाई पटेल असे जखमीचे नाव आहे.
दोघांचा जागेवरच मृत्यू-
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती, अशी की रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दमण येथील भाविक चालत शिर्डीकडे निघाले होते. त्यावेळी दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव शिवारामध्ये पेठकडून नाशिककडे जाणाऱ्या एका अज्ञात पिकपने विरुध्द दिशेने येऊन या भाविकांना उडवले. या धडकेत मनीष हडपती आणि अश्विन ईश्वर पटेल हे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. तर त्यांच्यासोबत असलेले हरीश भाई बाबुभाई पटेल हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या अफघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच घटना स्थळाचा पंचनामा करून दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.