नाशिक - सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने मालेगाव येथील अंजन गावातील दोघा सख्ख्या भावांचा विराणे धरणात बुडून मृत्यू झाला. घटनेमुळे अंजन गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील अंजन गावातील हर्षल आणि रितेश जाधव हे दोघे सख्खे भाऊ निमशेवडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. रस्त्यात विराणे जवळ माळमाथा पाणी पुरवठा योजनेचे धरण आहे. कार्यक्रमास अवधी असल्याने दोघेजण चुलत भाऊ भावेशसह धरणावर फिरण्यास गेले. धरणाच्या पाण्यात उतरून तिघे सेल्फी घेत अचानक शेवाळ्या वरून पाय घसरून हर्षल पाण्यात पडला. लहान भाऊ रितेशने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी जवळच असलेला भावेश दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. पण तोपर्यंत दोघे बुडाले होते. भावेश धरणाच्या भिंतीवरून वर आला. त्यानंतर त्याने घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना आणि कुटुंबाला कळवली. नागरिकांनी शोध घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. हर्षलने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. तर लहान भाऊ रितेश बारावीचे शिक्षण घेत होता. या घटनेची खकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - एक महिन्यापासून जायकवाडी धरणाचा वीज पुरवठा खंडित