नाशिक : उन्हाळा सुरू झाला की, पाण्याचे भीषण वास्तव समोर येते. नाशिकच्या ग्रामीण भागातील पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील चौड़ापाड़ा आणिमुलवड गावातील महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पाण्याच्या शोधासाठी डोंगराळ भागातून पायपीट करावी लागत आहे. एवढे करून खळग्यातील दूषित गढूळ पाणी गळणीने गळून पिण्यासाठी वापरावे लागते आहे. अशीच पायपीट आदिवासी पाड्यावरील महिलाही करत आहेत.
नाशिक म्हणजे धरणाचा जिल्हा : धार्मिक, अध्यात्मिक यासोबत धरणाचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठी 24 धरण आहेत. यातील 16 धरणे इगतपुरी तालुक्यात आहे. मात्र असे असतांना देखील येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. सरकारकडून जलजीवन योजनेचा गाजावाजा होत असताना इगतपुरी तालुक्यातील या पांड्यांवरील नागरिक आजही या योजनेपासून का वंचित आहे? यावरुन आदिवासी बांधव हे या देशाचे नाहीत का असा प्रश्न यलगार कष्टकरी संघटनेने शासनाला विचारत आहे.
मार्च महिन्यातच पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पुढील एप्रिल आणि मे महिना हा अधिक त्रासदायक असणार आहे-स्थानिक महिला
पाण्यासाठी पायपीट : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी शासनाने 15 लाख रुपये खर्च करून विहीर बांधली. मात्र या विहिरीला देखील गढूळ पाणी येत असल्याने हे पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट आदिवासी महिलांना करावी लागत आहे. निवडणुकीपुरते लोकप्रतिनिधी आश्वासन देतात, मात्र पुढील पाच वर्ष ते या गावांकडे फिरकत देखील नाही, असे ग्रामस्थ सांगतात.
नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी : ग्रामिण भागात नागरिकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नळ पाणी पुरवठा विहिरी, साधी विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अशा योजना राबविल्या जात आहे. या योजना आमच्या गावात राबवावा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नळाची मागणी होत आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला : नाशिक शहरातील मातीचे धरण असा नावलौकिक असलेल्या गंगापूर धरणाला गरज भासल्यास जवळच असलेल्या कश्यपी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची तहान जरी कश्यपी भागवत असली, तरी धरणाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्या वस्तींवरच्या नागरिकांना मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. गंगापूर धरणातून नाशिक शहरवासीयांची तहान भागवली जाते. गंगापूर धरणाची तहान कश्यपी भागवते, मात्र याच परिसरात रहिवाशांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी, लागते ही शोकांतिका आहे.