नाशिक - शहरात अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे. असाच एक विचित्र अपघात आज शहरातील चांडक सर्कल भागात असलेल्या श्रीहरी कुटे मार्गावर झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनावर झाड कोसळल्याने गाडीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने गाडीच्या मागील सीटवर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
श्रीहरी कुटे मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन या ठिकाणाहून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले झाड अचानक उन्मळून पडले. गाडीच्या मागील सीटवर कोणीही नसल्याने या अपघातात जीवितहानी टळली. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच रस्त्यावरून सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचेही या अपघातात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
रस्त्याच्याकडेला असलेल्या या धोकादायक झाडाबाबत अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. झाड पडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे झाड तातडीने हटवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.