नाशिक - जिल्ह्यात 243 दिवसात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्या वर गेला आहे. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.46 टक्के आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या यादीत नाशिक पाचव्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये 29 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 11 सप्टेंबरला रुग्णांची संख्या 50 हजारांवर गेली. पुढील 50 हजार रुग्ण अवघ्या 77 दिवसात आढळले.
एकूण रुग्णांची संख्या लाखावर -
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख 172 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक 66 हजार 130 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये 28 हजार 910 तर मालेगावमध्ये 4 हजार 307 रुग्ण आहेत. जिल्हा बाह्य 825 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 1 हजार 782 रुग्णांचा बळी गेला असून 95 हजार 626 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत .
सध्या 2 हजार 764 अॅक्टिव रुग्ण -
अॅक्टिव रुग्णसंख्येमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे पाठोपाठ नाशिक पाचव्या क्रमांकावर आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 764 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तालुका निहाय उपचार घेत असलेले रुग्ण -
नाशिक-96, चांदवड-83, बागलाण-65, दिंडोरी 67, देवळा-41, इगतपुरी-26, कळवण-17, मालेगाव-29, नांदगाव-84, निफाड-290, सिन्नर -302, सुरगाणा-1, त्र्यंबकेश्वर -30, येवला -14, नाशिक शहर - 1 हजार 519, एकूण 2 हजार 764.
कोरोना मृतांची संख्या -
नाशिक महानगरपालिका क्षेत्र - 902
नाशिक ग्रामीण - 666
मालेगाव महानगरपालिका - 171
जिल्हाबाह्य रुग्ण मृत्यू - 43
एकूण मृत्यू 1 हजार 782