नाशिक Tomato Prices Fall: मागील वर्षी द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडून टोमॅटोचे पीक घेतले. नाशिक जिल्ह्यातील एकट्या दिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात दीडशे रुपये किलोने जाणाऱ्या टोमॅटोला बाजार समितीमध्ये दीड रुपये किलो भाव मिळत आहे. तसेच बाजार समितीत आणलेला मालही व्यापारी घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिंडोरी बाजार समितीच्या मुख्य आवारासमोर रस्त्यावर टोमॅटो फेकून शासनाचा निषेध केला. टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना एकरी दीड लाखपर्यंत खर्च येतो; परंतु उत्पन्न रुपयात मिळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक मोठ्या कष्टाने जगविले आणि पिकविले; मात्र सध्या मिळत असलेला बाजार भाव 50 ते 70 रुपये कॅरेट असल्याने यात साधा टोमॅटो खुडण्याचा आणि बाजारात नेई पर्यंतचा खर्च सुद्धा निघत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भावनांचा लाल चिखल झाला आहे.
सरकारचे उदासीन धोरणं: दोन महिन्यांपूर्वी मूठभर लोकांना टोमॅटो पिकाने लखपती जरी बनवले असले तरी हजारो शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता कर्जबाजारी करण्याचं काम टोमॅटो मुळे झालं आहे. टोमॅटोवर आधारित असणारे कीटकनाशक विक्रेते, नर्सरी व्यावसायिक, कामगार वर्ग व इतर अनेक घटक साखळी खूप मोठी असून हे अर्थचक्र देखील खूप मोठे आहे. सरकार शेतीमालाचे भाव वाढले की निर्यात बंदी करून आयात करते. मग आता भाव कोसळले असताना सरकार का काहीच उपाययोजना करत नाही. निर्यात शुल्क कमी करून निर्यातीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे यांनी केली.
पिकावरील खर्चही वसूल होणार नाही: पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही चांगले बाजारभाव मिळतील म्हणून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र आज याच टोमॅटोला मार्केटमध्ये प्रति किलोस दोन ते तीन रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नसल्याचं शेतकरी सांगतात.
हेही वाचा: