दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात एका स्कुटीवरून जाणाऱ्या तीन मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात नाशिक पेठ महामार्गावर उमराळे गावाजवळ कन्हैया ढाब्याजवळ झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेले स्टेटस हे मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे.
रोहित शार्दूल (रा. दिवा, मुंबई), निशांत मोहिते (रा. पंचवटी नाशिक) आणि अनिकेत मेहरा (रा. अवनखेड) हे तीन मित्र एकाच स्कुटीवरून फिरायला जात होते. त्यांनी 'लॉंग ड्राइव्ह विथ माय ब्रदर' (मित्रांसोबत दूरवरचा प्रवास) असे स्टेट्स सोशल मीडियावर ठेवले. या तीन मित्रांचा मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या पेठ रोडवर अपघात झाला. त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला आहे. स्कुटी व पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.