नाशिक : लहानपणापासूनच लहान उंचीमुळे पूजा घोडकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, केवळ 3 फूट उंची असलेली पूजा आयुष्यात काय करणार? हा कौटुंबिक प्रश्न होता, तिला लहानपणापासूनच तिच्या उंचीमुळे अनेकांनी छेडले होते. मात्र, अशा परिस्थितीत पूजाच्या पालकांनीही तिला खंबीर साथ दिली. तिच्या घरच्यांनी तिला अभ्यासासाठी आग्रह केला. तिने एम.कॉम. केल्यानंतर तिच्या उंचीमुळे नोकरी मिळण्यात अडचण आली. या सर्व अडचणींनंतर पूजाने स्वत: व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक व्यवसायांची माहिती घेतल्यानंतर तिने बँकेकडून कर्ज घेऊन पापड व्यवसाय सुरू केला. तिची मेहनत,जिद्द यामुळे ती एक यशस्वी उद्योजक बनली आहे.
शिक्षणाची उंची मोठी : 'माझे वय वाढत होते, मात्र उंची वाढत नव्हती. त्यामुळे माझे कसे होणार यांची चिंता सतत कुटुंबीयांना जाणवत होती. माझी उंची कमी असली तरी मी हुशार होते. त्यामुळे माझ्या आईने मला शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. मला मुलींच्या महाविद्यालयात टाकण्यात आले. जेणेकरून माझी उंची कमी असल्याने कोणीही मला चिडवू नये, पण तिथेही मला चांगले-वाईट अनुभव आले. अनेकांनी माझी छेड काढल्याने मी दुखावले गेले. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करुन एमकॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मला बँकेत नोकरी करायची होती. त्यासाठी मी अनेक परीक्षा दिल्या पण नापास झाले. माझ्या वडिलांचा छोटा पापड उद्योग होता. मी त्यात काहीतरी करण्याचा विचार केला. घरातील सदस्यांनीही मला पाठिंबा दिला. जेव्हा मला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा होता, तेव्हा मला पैशांची गरज होती. तेव्हा मी बँकेची मदत घेतली. आज माझा पापड उद्योग चालू आहे. तसेच माझ्यामुळे, मी इतर महिलांना नोकरी दिली याचा आनंद आहे'. अशी प्रतिक्रियी पूजा घोडके यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.
आनंदाने जगा : 'मी इतरांकडे पाहून स्वतःला प्रोत्साहित करते, जेव्हा मला माझ्यापेक्षा काही अधिक अपंग दिसतात, काही अंध आहेत, काही अंथरुणाला खिळलेले आहेत अशा वेळी मी स्वतःला भाग्यवान समजते. आपल्याकडे या सर्व गोष्टी आहेत. आपण आनंदाने जगले पाहिजे. जेव्हा मी पाहते की, काही तरुण मुले, मुली सर्व काही असताना छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला जीव देतात, तेव्हा खूप वाईट वाटते. मला त्या आत्महत्याग्रस्त मुलांना सांगायचे आहे, ज्यांच्या पालकांनी त्यांना 25-30 वर्षे सांभाळ केला त्यांना त्रास देऊ नका असे पूजाने सांगितले'.
जिद्दीने पापड व्यवसाय केला सुरू : जेव्हा मला डॉक्टरांनी पूजाची उंची तीन फुटांपर्यंत राहील, असे सांगितले तेव्हा आम्हाला तिची काळजी वाटली. सुरुवातीला तिला अनेक अडचणी आल्या. तिला बसमध्ये चढता आले नाही, त्यामुळे पुढील शिक्षण कसे करायचे हा प्रश्न होता. 10वी नंतर पुढील शिक्षण कसे करावे असा प्रश्न आम्हाला पडला मात्र, कॉलेज जवळच ती तीन वर्षे तिच्या काका-काकूंकडे राहिली. तिने एम.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या जिद्दीने तिने पापड व्यवसाय सुरू केला, आम्हीही तिला या व्यवसायात साथ देतो, ती माझी मुलगी नसून माझा मुलगा आहे अशी प्रतिक्रिया तिच्या आईने दिली.