दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील तीन संशयित कोरोना रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चारवर पोहचली आहे. यात इंदोरे येथील रुग्णांच्या संपर्कातील 25 व 18 वर्षीय दोन, तर निळवंडी येथील 40 वर्षाचा एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
नऊ मे ला इंदोरे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 17 संशयितांचे नमुने तपासणीस पाठवले होते. त्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली असून नवीन रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेत त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. निळवंडी येथे प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ विलास पाटील आदींसह वैद्यकीय पथकाने भेट देत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
निळवंडी येथील रुग्ण हा जिल्हा रुग्णालयात इतर आजारावर उपचार घेण्यासाठी गेला होता. त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचे निदान झाले. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत त्यांना विलगीकरन कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच तो राहत असलेल्या घरापासून 1 किलोमीटर परिसर कन्टेंमेन्ट झोन व 2 किमीपरिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी सर्वेक्षण आरोग्य तपासणी आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळत, मास्क किंवा रुमालाचा नियमित वापर करत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे तसेच सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.