नाशिक - देशातील 10 राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल आहे. सोमवारी उत्तराखंड, महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्देश दिले आहे. नाशिक जिल्ह्यात सद्यास्थितीत बर्ड फ्लूची एकही केस नसली, तरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून तालुका निहाय पक्षांच्या सर्वेक्षणासाठी 30 रैपीड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मवरील 94 लाख कोंबड्या पथकाच्या निगरणीखाली आहे.
कोंबड्यांच्या उत्पादनात नाशिक जिल्हा अव्वल -
देशातील तामिळनाडूतील पडलम जिल्ह्यानंतर नाशिक जिल्हा हा कोंबडी उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा आहे. राज्यात महिन्याकाठी सुमारे चार कोटी कोंबड्यांचे उत्पादनात घेतले जाते. त्यात निम्याहून अधिक उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. राज्यात दिवसाला पोल्ट्री उद्योगाची सरासरी उलाढाल 14 ते 15 कोटी रुपयांची असून एकट्या नाशिक जिल्ह्याची सरासरी उलाढाल 7 ते 8 कोटी इतकी आहे. सध्या मार्गशीर्ष महिना असल्याने उपासाचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी संक्रातीनंतर मांसहाराचे प्रमाण वाढत असल्याचे कोंबडी विक्रेते सांगतात.
उकळून खाल्लेल्या मांसामुळे कोणताही धोका नाही -
नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूची एकही केस नाही. जरी बर्ड फ्लू असला तरी कोंबड्यांची अंडी आणि मास उकळून खाण्यास हरकत नाही. 70 डिग्री सेल्सिअसमध्ये कोणताही विषाणू जिवंत राहत नाही. आपल्याकडे 100 डिग्री सेल्सिअस तापमानात मास उकळून घेतले जाते. त्यामुळे त्यापासून कोणताही धोका नाही, असे सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनराज चौधरी यांनी सांगितले आहे.
20 टक्के मागणी घटली -
बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबड्यांची मागणी 20 टक्के घटली आहे. दरातही घट झाली असून 90 रुपये बाजारात मिळणारी कोंबडी ही 50 रुपयांवर आली आहे. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा किलो मागे 10 रुपये वाढ झाली असून 65 रुपये किलो आली असल्याचे आनंद अग्रोचे अध्यक्ष उद्धव आहिरे यांनी सांगितले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये -
नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूची एक ही केस अद्याप नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच सध्या कोविड युद्धामध्ये उपयोगी ठरणारे प्रोटीनचे मार्ग म्हणजे अंडी आणि चिकन यांच्या वापरावरही प्रतिकूल परिमाण होत आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.
स्थलांतरित पक्षीही निगरणीखाली -
स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू हा आजार पसरू नये, यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, ओझरखेड, गंगापूर या धरण क्षेत्रातील स्थलांतरित पक्षांच्या मरतुकीवरही प्रशासन लक्ष ठेऊन आहे.
हेही वाचा - 'उद्धव ठाकरे आपडा' टॅगलाईनवरून मुख्यमंत्री कार्यालयाला मनसे आमदाराचे गुजरातीत ट्विट