नाशिक - राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणेवर चोरट्यांनी लुटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात निखिल जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व घटनेमुळे निखिलला दोन दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
निखिल मंगळवारी रात्री सराव करून येत असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर लुटण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी निखिलला अडवले. मात्र, त्याच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांची निराशा झाली आणि रागातून त्यांनी निखिलवर कोयता आणि चाकूने हल्ला केला.
पुणे येथील नाशिक फाट्याजवळ आर्मी बोटिंग क्लब येथे १७ ते १९ दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून या स्पर्धेची निखिल पूर्वतयारी करत होता. मात्र, या हल्ल्यामुळे निखिलला या स्पर्धेला मुकावे लागणार असल्याने त्याचे एक वर्षाचे नुकसान होणार आहे. निखिलच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. निखिलने याआधी या स्पर्धेत सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक पटकावले आहे. नाशिक शहरात दिवसेंदिवस प्राणघातक हल्ल्याचे प्रकार वाढत असताना आता क्रीडा क्षेत्रातून या हल्ल्याचा निषेध होत आहे.