नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे आता थर्मल स्कॅनिंग आणि नाव नोंदणी केली जात आहे. संशयित आढळल्यास संबंधित व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. आतापर्यत दोन दिवसात ६०० व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाला मास्क बंधनकारक केले गेले आहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या घरात गेली आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात कर्मचारी संख्येवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत कार्यालयांत होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. तरीदेखील जिल्हाधिकारी तसेच तहसील व शासकीय कार्यालयांमध्ये महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने १६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील पोर्चमध्ये टेबल खुर्ची मांडत ही व्यवस्था केली गेली आहे. त्यासोबतच थर्मल स्कॅनिंग करत संबंधित व्यक्तींच्या शरीराचे तापमानदेखील मोजले जात आहे. त्याची नोंदही रजिस्टरमध्ये केली जात आहे. त्यामुळे, शरीराचे तापमान अधिक असलेल्या व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जात नाही. तसेच त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्लाही दिला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही नियमित थर्मल स्कॅनिंग आणि नाव नोंदणी केली जात आहे. १६ आणि १७ जून या दोन दिवसांमध्ये प्रतिदिन ३०० याप्रमाणे तब्बल ६०० नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्कॅनिंग करण्यात आले. हे स्कॅनिंग करण्यासाठी इंटर्नशिप करत असलेल्या दोन डॉक्टर विद्यार्थ्यांची स्वतंत्र नेमणूकही करण्यात आली आहे.