नाशिक - शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे मात्र, महानगरपालिका हद्दीच्या 1 किलोमीटर बाहेरील चांदासी नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेजची सोय, अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक हैराण आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक शहर झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या भागत राहण्यासाठी नागरिक पसंती देत आहेत. त्यामुळे चांदासी भागात राहण्याला अनेक नागरिक आले आहेत. या भागात नव्याने 5 हजाराहून अधिक नवीन फ्लॅट आणि बंगल्यामध्ये नागरिक राहण्यासाठी आले आहेत. तसेच अनेक नवीन प्रकल्प येथे पूर्णत्वास येत आहेत. मात्र, महानगरपालिच्या हद्दीच्या बाहेर असल्याने हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
येथे पावसामुळे कच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. त्यामुळे या भागात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या देखील नागरिकांना भेडसावत आहे. परिसरात सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने गटारीचे पाणी सर्रास रस्त्यावर वाहतांना दिसते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंगू आणि इतर साथीच्या आजरांचा प्रादुर्भाव झाला आहे.
या समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा एनएमआरडी आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदनही दिले आहे. मात्र, अद्याप समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.