नाशिक - ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोफत शासकीय रुग्णवाहिका योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मनखेड येथील रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
हेही वाचा - रुग्णवाहिका येण्यास उशिर, चिमुरडीचा उपचाराअभावी रस्त्यातच मृत्यू
मनखेड, जायविहीर,आंब्याचापडा,पाचविहीर, हेमाडपाडा, कवेली, गळवड ,दुमी,ओरंबे, मांगले या आदिवासी गावांमधील रुग्ण मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित उपचारासाठी येत असतात. अनेक दिवसांपासून रूग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्धांसह गरोदर मातांना खासगी वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, रुग्णवाहिका लवकरात लवकर दुरुस्त करण्याची अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.