नाशिक - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होण्याची भावना नाशिककरांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत भाजप-सनेला कौल दिला. मात्र, मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि राज्यात राजकीय उलथापालथ झाली. कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मतदारांनी स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नामुष्की ओढवली. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारीचे अनेक प्रश्न युवकांना भेडसावत आहेत. आर्थिक मंदीचे सावट राज्यावर आहे. अशात राज्याला कोणीच वाली नसल्याची भावना नाशिककर नागरिकांनी व्यक्त केली. कोणत्याही राजकीय पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन करून महाराष्ट्रातील प्रश्न मार्गी लावावे, अशी भावना नाशिककर नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.