नाशिक - शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना शहर लॉकडाऊन करण्याची विनंती करणार असल्याचे महापौर सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा आकडा वाढत असून, सध्या शहरात हजारपेक्षा जास्त रूग्ण असून संपूर्ण जिल्ह्यात हा आकडा २ हजार ५०० च्यावर गेला आहे. पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासाठी भाजप आग्रही आहे. भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज शंभराहून अधिक रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी संघटना आणि व्यापारी वर्ग शहर लॉकडाऊन करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार असल्याचे महापौर म्हणाले.