नाशिक (नांदगांव) - मुंबई साकिनाका येथील घटना ही घटना क्लेशदायक आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला. यातील आरोपींना कठोर शासन करणार. हा खटाल फास्टटॅग कोर्टात चालवणार असून त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती करणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. ते जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील जातपडे साकोरा यासह नांदगांव शहरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
मुंबईत साकीनाका येथील खैराणी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून, तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले होते. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने ही पीडित महिला वाचू शकली नाही. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.
'आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देणार'
भुजबळ यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देऊन समाजाला दाखवून देऊन की अशा निच कृत्य करणाऱ्यांना कशी शिक्षा असते ते. असही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. सध्या माणसांची प्रवृत्ती ही अमानुष झालेली आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. तसेच, समाजात अशाच प्रवृत्ती वाढणे हेही मोठे धोकादायक आहे, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
'सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ पंचनामा करून घ्यावेत'
या नुकसान पाहणी दौऱ्यात भुजबळ यांनी येथील नागरिकांशीही संवाद साधला. तसेच, सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ पंचनामा करून घ्यावेत. अन्यथा लोक सांगितील त्याच गोष्टी ग्राह्य धरून त्यांना मदत पोहचवा असे स्पष्ट आदेश भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.