नाशिक - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नाशिक येथील श्री काळाराम मंदीर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान खोदकाम करतांना साडेचार फूट खोलीच्या दगडी पायऱ्या आढळून आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
काही दिवसापासून श्री काळाराम राम मंदिर परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. खोदकाम करतांना पायर्या चढून आल्यानंतर काम थांबवण्यात येऊन रात्री पुन्हा पूर्व दरवाजाच्या बाहेर रस्त्याचे खोदकाम केले जाणार आहे. अशी माहिती काळाराम मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी दिली आहे. शेकडो वर्षांपूर्वी उभारलेल्या काळाराम मंदिराबाहेर आढळून आलेल्या जुन्या पायऱ्या या पूर्वीच्या मूळ बांधकामाच्या वेळच्या असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पूर्वी या ठिकाणी पायर्या तसेच बसण्यासाठी चबुतरा असल्याचा अंदाज जुन्या जाणकारांनी वर्तवला आहे.
खोदकाम करत असतांना आढळून आलेल्या पुरातन पायऱ्यांचे मेसेज व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेकडो नागरिकांनी बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली. खोदकाम चालू असतांना पायऱ्यांच्या विविध ठिकाणी एक लोखंडी नाल देखील आढळून आली आहे. मुख्य पूर्व दरवाजाच्या दोन्ही बाजूला अडीच ते तीन फुटापर्यंत दगडी ओटे असल्याचे आढळून आले आहे. त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा होती हे निश्चित झाले आहे. रात्री मंदिर परिसरातील समोरील रस्ता खोदकाम करण्यात येणार आहे. त्यानंतर या पुरातन पायऱ्यांचे गूढ उकलले जाईल असे मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.